Sunday, 3 July 2016

कर्म आणि फळ Article by Dr.Sapna Sharma

*कर्म आणि फळ*
(दैैनिक सकाळ- ३ जुलै) 
Please SHARE if you believe it can help someone

लहानपणा पासून भगवद्गीता म्हणजे "कर्म किये जा फल कि चिंता मत कर" हेच वाक्य आठवायचं. सुरवातीला फक्त सिनेमात ऐकलेलं वाक्य म्हणून आणि नंतर काहीतरी आपल्याला खूप मोठ कळतंय हे स्वतःला आणि दुसर्यांना दाखवायला.
थोडी अजून मोठी झाल्यानंतर आणि स्पर्धात्मक जगात शिरल्यावर हे वाक्य काहीसं गमतीदार वाटायला लागलं. "काहीतरीच काय? इतकी मेहनत केल्यावर काय मिळणार ह्याचा विचार नाही केला तर मेहनतीतील सगळा उत्साहच संपेल.… कशाला करायची सगळी मरमर… पडून रहाउया कि आरामात … सगळेच पडले राहतील…" असे विचार मनात पिंगा धरायला लागले.
त्याच वेळी हिम्मत करून भगवद्गीता वाचूनही काढली. काय कळले कुणास ठाऊक पण वाटल "हे सगळं बोलायला बर आहे पण गीतेचा खर्या जगाशी काही नातं नाहि. कुठल्यातरी काळात कुणीतरी लिहिलेला एक ग्रंथ आजच्या वेगवान जगात अगदीच निरर्थक आहे."
काही काळ आणखी लोटला. मी आजच्या जगात स्वतःची जागा बनवू पहात होते. सतत धावपळ, ओढ- ताण… विश्रांतीला वेळ नाही, आणि दमल्यानंतरही विचारांना थांबायची परवानगी नाहि. हे करायचं, ते आटोपायचंय, अमुक राहून गेलंय, तमुक विसरूनच गेले, आज हा नाराज तर नाही ना? त्यांच्यासाठी सगळ व्यवस्थित केल ना मी? काही राहायल तर? तो काय म्हणेल? अमुक काम झालच नाही तर? मुलं व्यवस्थित मोठी होतील ना? … एक ना अनेक. गीतेचा विचारही करायला मग वेळ नव्हता. सतत काळजी, सतत टेन्शन, सतत कसली तरी भीती, सतत कसली तरी हुरहुर… पण आयुष्यात काहीतरी कर्तबगारी करायची तर असच तर असावं लागतं ना?
नाही!!
मी माणूस आहे देव नाही ह्याची प्रचीती लवकरच येऊ लागलि. सततच्या शारीरिक आणि मानसिक ताणाचा परिणाम यथेच्च झाला. आधी चिडचिड वाढली, मग कार्यक्षमता कमी झाली, कामात आणि व्यवहारात मागे पडायला लागले म्हनून आणखीनच चिडचिड आणि काळजी वाढली… नाती दुरावयाला लागली आणि सगळच जणू कोसळलं. मग उदासीनता आणि शेवटी खिन्नता. सगळ्यात मजेदार म्हणजे त्या वेळेचे विचार काहीसे असे, "काय ठेवलय ह्या सगळ्या भानगडीत? मला काहीच करायचं नाही!"
आणि मग थांबावच लागलं, विचारांची दिशा हि बदलावी लागलि. कारण पुढे काहीच दिसत नसतांना जगण्याची इच्छाच जणू संपली. थोडा काल खिन्नतेत गेल्यावर जाणवल कि, 'किती जगायचं ते माझ्या हातात नाहि. आणि कुठल्यातरी लक्ष्या शिवाय एकही दिवस जगणे कठीण होते. पण लक्ष्य शोधलं तर परत तेच आयुष्य?? "कर्म किये जा फळ कि चिंता मत कर"… कसं शक्य आहे? '
आणि मग लक्ख प्रकाश पडला "कर्म किये जा और फळ कि इच्छा मत कर" असं कुठे म्हंटल आहे? फक्त चिंता मत कर!!! म्हणजे कर्म हि कर, लक्ष्य हि ठेव आपल्या समोर पण ते लक्ष्य पूर्ण होईल कि नाही हि चिंता नको करुस… कारण पूर्ण विश्वासाने आणि समर्पण भावनेने केलेले कुठलेही सद्कार्या सफलच होणार. पण आपल्यात श्रद्धेची कमी आहे- आपल्या पेक्षा ताकतवर शक्तिवर आणि स्वतःवरहि. आपला सगळा त्रास ह्या अविश्वासू वृत्ती पासूनच जन्म घेतो. आविश्वासात आपण चुका करतो, लोकांना दुखावतो, त्यांच्यावर वर्चस्व गाजवतो, स्वार्थी निर्णय घेतो आणि भीतीपोटी सुख- आनंद घालवतो.
कार्य कराल तर काही तरी फळ मिळेलच. कधी मनाजोगं, तर कधी त्याहूनही अधिक, त्याहूनही सुन्दर. कधी वाटेल थोड कमी मिळालं पण श्रद्धेने स्वीकारून परत पुढचं पाउल त्याच विश्वासाने हसत खेळत उचलायला कुणाची मनाई आहे का? पुढे नवीन लक्ष्य आणि नवीन उत्साह!
आता मी मुद्दामून कुणासाठी वाईट विचार करत नाही, कामात १०० टक्के गुंतते, नाती जमेल तशी सांभाळते आणि मुलांना माझ्याकडे जे संस्कार आहेत ते देण्याचा प्रयत्न करते. ते काय घेतात ह्याची काळजी करत नाही आणि कोण कसा विचार करेल ह्या भानगडीत पडत नाहि. आयुष्यात प्रत्येक क्षणात नवीन लक्ष्य अनुभवते आणि रात्री सगळं विसरून गाढ झोपते. हे शक्य आहे का? सहजच! फक्त त्यासाठी हवी आंतरिक श्रद्धा!
चिंता सरो- श्रद्धा जागो!!

http://drsapnasharma.com/ 

No comments:

Post a Comment