Sunday 17 July 2016

असुरक्षिततेचा दोर- Dr. Sapna Sharma-(दैनिक सकाळ- १७ जलै २०१६) Please SHARE if you believe this can help someone

असुरक्षिततेचा दोर- Dr. Sapna Sharma-(दैनिक सकाळ- १७ जलै २०१६)
Please SHARE if you believe this can help someone




एक अतिशय सुंदर गोष्टं वाचनात आली. 
एक गिर्यारोहक पर्वतारोहणासाठी निघाला असतांना एका सुंदर कठड्यावरून त्याचा पाय घसरला. उंची बरीच होती पण त्याच्या पोटाला बांधून असलेल्या दोरामुळे तो मधेच लटकला. अशाच अवस्थेत बराच वेळ निघून गेला पण धुकं आणि थंडी बरीच असल्याने कुणी त्याची हाक ऐकली नाहि. अंधार आणि थंडी जस जशी वाढत गेली तसेच त्याचे नैराश्य हि खोलावले. हळू हळू मेंदू सुन्न होऊ लागला तसा त्याने परमेश्वराचा धावा सुरु केला. मग कुठल्या एका क्षणी त्याच्या मनातून आवाज आला, तो दोर सोडून दे”… भीतीपोटी त्याने तो दोर आणखीनच घट्ट पकडला. काही काळानंतर परत तसाच आवाज आला. पण एव्हाना त्याला स्वतःवरही शंका होऊ लागली होति. दुसरा दिवस निघाल्यावर जेंव्हा बचाव दल त्याला शोधत तिथे पोहोचले तेंव्हा तो मरण पावला होता. त्यांनी आपल्या अहवालात लिहिले, मृत्यू चे कारण- अतिशीत(फ्रीझिंग). मृत्यू समयी तो आपला दोर घट्ट पकडून झुलत होता- *जमिनी पासून फक्त सहा फुट वरती!*


त्याने दोर सोडला असता तर?
पण वस्तुस्थिती हि आहे कि त्याने दोर सोडलाच नाहि. जमीन जवळच होती, सुटकेचा मार्ग होता, उपाय ही सोपाच होता फक्त धुक्यामुळे दिसत नव्हतं. खरं म्हणजे त्याच्याकडे दुसरा उपाय नव्हता. शेवटचा पर्याय म्हणून तरी त्याने त्या आतल्या आवाजाकडे लक्ष द्याटला हवे होते. पण जे दिसत नाही त्याची आपल्याला भीती वाटते. आपण भौतिकवादि आणि फक्त डोळ्यावर विश्वास ठेवणारे. अंतरात्मा किंवा तिचा आवाज वगैरे गोष्टी आपल्याला फालतू वाटतात. कारण ती आपल्याला दिसत नाही.

पण जे दिसतं तिथे सगळी उत्तरे नसतात आणि बरीच उत्तरे मनातून आलेली असतात — हे मी म्हणत नाही- आपण सगळ्यांनाच असे अनेक अनुभव आलेले आहेत. कुठल्यातरी घटनेचा निकाल काय लागणार ते मनात कुठेतरी माहीत असतं. कधी कधी नेहमीची बेल वाजली तरी फोन कुणाचा आहे हे आधीच कळतं . अमुक व्यक्ती बरोबर व्यवहार करू नये हे बरेचदा पहिल्या भेटीतच कळतं. हे अनुभाव आपल्या सगळ्यांचेच आहेत. पण भौतिकवादाच्या आपल्यावरील पकडी मुळे तर कधी लोक हसतील ह्या भीतीने त्या सुज्ञ आवाजाकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि कालांतराने आपल्या अंतर्मनातील सर्वज्ञ बुद्धिमत्तेला आपण जुमानायचे नाही हे ठरवतो.

आपले अंतर्मन/ आत्मा ही अमर्यादित, सर्वव्यापी आहे. पण ती भौतिक डोळ्यांनी दिसत नाही. ह्या अंतर्मनाला कशाचीच भीती नाही कारण तिचा मूळ गुणधर्म हा अखंड श्रद्धा आहे. भूत, वर्तमान आणि भविष्यात एकाच वेळी वावरणारी आत्मा सर्वज्ञ आहे आणि म्हणून आपल्याला जे दिसत आणि समजत नाही त्याची चाहूल आपल्याला अंतर्मन देत असते.
आपल्या लहान लहान भीतीं पोटी आपण मोठे ध्येय साधत नाही. बरेचदा आपण दीर्घ काळ करत असलेले कार्य अर्धवट सोडून देतो कारण भौतिक जग सांगत की हे कठीण आहे आणि अंतर्मनाला आपण जुमानत नाही. त्या सहा फुटावर रोखून ठेवलेल्या दोरा सारखेच आपली भीती आपल्याला मोठ्या यशापासून दूर ठेवते. त्याच असुरक्षतेपायी आपण आनंद आणि प्रेमाच्या सुखालाही दुरावतो आहोत.
श्रद्धा गहाळ आहे. भौतिक असुरक्षिततेचा दोर आम्हाला बांधू पहातोय. आणि आम्हीही त्या असुरक्षिततेला घट्ट बिलगून बसलो आहोत. आपले खरे समभाव्य शोधून काढण्याची आमची हिम्मत नाही. जे दिसते त्यालाच चिकटून बसलोय आणि ह्या असीमित निसर्गाकडे जो आपल्यासाठी असीमित खजिना आहे तो आपल्या पासून थोड्याच अंतरावर असूनही आपण त्याला मुकत आहोत.
दोर सोडायला हवा. श्रद्धा वाढवायला हवी.


1 comment: